भालोद, ता. यावल संदीप होले । हरीभाऊ जावळे हे खर्या अर्थाने संघाचे सच्चे स्वयंसेवक होते. त्यांच्या सारख्या समर्पित व्यक्तीमत्वाचा आम्हाला प्रदीर्घ काळ सहवास लाभले हे आमचे सौभाग्यच होय अशा शब्दात आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांना आदरांजली अर्पण केली. आज स्व. हरीभाऊ जावळे यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त आयोजीत आठवणीतले हरीभाऊ या कार्यक्रमात ते बोलत होते.
दिवंगत हरीभाऊ जावळे यांच्या पहिल्या स्मृती दिनी आठवणीतले हरीभाऊ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे, आ. संजय सावकारे, बेटी बचाओ-बेटी पढाओचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके, महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, भक्तीकिशोरदासजी महाराज, मानेकर शास्त्री बाबा. श्रीमती कल्पना जावळे, अमोल जावळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. जतीन मेढे यांनी केले. यशस्वीतेसाठी हरीभाऊ जावळे मित्र परिवाराने सहकार्य केले. या कार्यक्रमात प्रारंभ हरीभाऊ जावळे यांची प्रतिमा व अर्धाकृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यानंतर विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून त्यांच्याबाबतच्या आठवणी जागविल्या.
याप्रसंगी आ. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, अजूनही विश्वास बसत नाही की हरिभाऊंना आमच्यातून जाऊन एक वर्ष झाले ! त्यांचे आणि माझे संबंध खूप जवळचे होते शेतकर्यांसाठी आणि शेतीसाठी सतत झटणारा हा माणूस आमच्यातून अचानक निघून गेला. आजही मला स्पष्ट आठवते, त्यांची तब्येत थोडी बिघडली होती त्यादिवशी आम्ही सोबत होतो एक निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले होते मी त्यांना म्हणालो होतो की लगेच डॉक्टरकडे जा. त्यावर नेहमीसारखी अंगात कणकण असेल काही होणार नाही असे ते म्हणाले होते. पुढे त्यांना मुंबईला न्यावे लागले आम्ही सगळे सोबत होतो. दोन-चार दिवसात ते बरे होतील असे सगळ्यांना वाटत होते. त्यांची प्रकृती अशी गंभीर होईल असे कधीच वाटले नव्हते ….. हरिभाऊंसारखी शेतीची तळमळ कुणालाच नव्हती रकरणात असा माणूस आमच्यासोबत असणे हे आमचे भाग्य होते संघाचे ते खरे निर्लेप कार्यकर्ते होते.
लोकसभेच्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी रद्द झाली तरी ते शांत होते आणि थोडा वेळ जाऊ द्या सगळे शांत होतील आणि बाकीचे मी पाहून घेईन असा धीर तेच आम्हाला देत होते ! संघाची शिकवणं त्यांनी अंगिकारली होती. जावळे परिवारही त्यांनी त्यांच्यासारखाच शांत घडवला. राजकारणातल्या विरोधकालाही वाटायचे की हरिभाऊ आपल्यासोबत असावे कारण ते कधीच कुणाशी वैरभावाने वागले नाहीत साखर कारखाना वाचवण्यासाठीही त्यांची नेहमी धडपड असायची. मी संघाच्या शिबिराच्या निमित्ताने दहावी – अकरावीला होतो तेंव्हापासून या गावात येत होतो आणि त्यांच्या संपर्कात होतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे राजकारणात आपल्या कुटुंबातून कुणीतरी वारसा आपला पुढे चालवावा असा त्यांचा विचार नव्हता आम्ही कधी म्हणालो तरी ते म्हणायचे की तशी चिंता मला नाही माझ्यानंतर कुणीतरी माझा कार्यकर्ता पुढे येईलच न … अशा कित्येक आठवणी याप्रसंगी आमदार गिरीश महाजन यांनी जागवल्या. आम्ही भाजप परिवार म्हणून यापुढे अमोलच्या सोबत आहोत अशी ग्वाहीही आमदार महाजन यांनी यावेळी दिली.