जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कांचन नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला ठाणे येथील सासरी सहा लाख रुपयांची मागणी करत मारहाण व छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुरूवारी९ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता शनीपेठ पोलिस ठाण्यात तिच्या पतीसह सासू व दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील कांचन नगरातील रोहिणी भुषण सोनवणे (वय २४) यांचा विवाह ठाणे येथील भुषण उमाकांत सोनवणे यांच्याशी रीतीरिवाजानुसार झाला होता. विवाहानंतर, काही दिवसांनी पतीने किरकोळ कारणांवरून वाद सुरू केला आणि त्यानंतर माहेराहून सहा लाख रुपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाहीत म्हणून तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली, तसेच तिच्या सासू आणि दीर यांनी देखील पैसे मिळवण्यासाठी छळ सुरू केला.
हा प्रकार सहन न झाल्याने विवाहितेने आपल्या माहेरी पळून जाऊन शनीपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती भुषण उमाकांत सोनवणे, सासू छाया उमाकांत सोनवणे आणि दीर पवन उमाकांत सोनवणे या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक योगेश जाधव हे पुढील तपास करीत आहेत.