तेहरान-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | इस्रायलच्या दोन मोठ्या शत्रूंचा गेल्या २४ तासांमध्ये सफाया झाला आहे. लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये हेजबुल्लाहचा फऊद शुकर आणि इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासचा प्रमुख इस्माईल हानियाची हत्या झाली आहे. शुकरच्या हत्येची जबाबदारी इस्रायलनं घेतलीय. हानियाला देखील इस्रायलच ठार केले, असे मानलं जात आहे. याबाबत इस्रायलकडून अद्याप कोणतंही वक्तव्य आलेलं नाही. पण, इराणी मीडियानं हानियाच्या हत्येचं खापर इस्रायलवरच फोडलं आहे.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने हानियाच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. आयआरजीसीने याबाबत एक वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार ‘तेहरानमधील हानियाच्या घरात त्याला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात हमास प्रमुख इस्माईल हानिया आणि त्याच्या बॉडीगार्डची हत्या झाली आहे. एका स्फोटात या दोघांची हत्या झाल्याचं आयआरजीसीने स्पष्ट केली आहे.
विशेष म्हणजे इस्माईल हानिया मंगळवारी सकाळीच इराणचे नवे अध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होता. या कार्यक्रमात त्यानं इराणच्या सर्वोच्च नेत्याची भेट घेतली होती. त्यानंतर काही तासांनीच त्याच्यावर हा हल्ला झाला.