मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुका पुन्हा एकदा अवैध धंद्यांविरुद्धच्या मोठ्या कारवाईमुळे चर्चेत आला आहे. आज सकाळी मुक्ताईनगर पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून १० ते १२ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या कारवाईमुळे आंतरराज्य गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

अशी झाली कारवाई:
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरकडून छत्रपती संभाजीनगरकडे एका ‘आर्टिका’ कारमधून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मुक्ताईनगरजवळील खामखेडा पुलाजवळ पहाटेपासूनच नाकाबंदी केली. संशयास्पद वाटणारी कार अडवून तिची झडती घेतली असता, त्यात गोण्यांमध्ये भरलेला प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

मुद्देमाल आणि तपास:
पोलिसांनी १० ते १२ लाख रुपये किमतीचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण मोठा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. हा गुटखा नेमका कोणाचा होता आणि तो कोणत्या व्यापाऱ्याला पोहोचवला जाणार होता, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. सध्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तस्करांमध्ये खळबळ:
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आधीच कडक बंदोबस्त असताना, पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई कौतुकास्पद मानली जात आहे. मुक्ताईनगर परिसरातील नागरिकांनी या धडक कारवाईचे स्वागत केले असून, अवैध धंद्यांविरुद्ध अशीच मोहीम सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.



