धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय भूकंप झाला आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत त्यांना मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडी प्रणित ‘शहर विकास आघाडी’च्या उमेदवार लिलाताई सुरेश चौधरी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार वैशाली पप्पू भावे यांचा मोठ्या फरकाने पराभव करत नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर कब्जा मिळवला आहे.
धरणगाव तहसील कार्यालयात आज सकाळी १० वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. सुरुवातीच्या टप्प्यापासूनच लिलाताई चौधरी यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते. पहिल्या फेरीचा निकाल हाती येताच लिलाताईंनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. महाराष्ट्र जनविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली भावे यांनी कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र मतदारांनी लिलाताईंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले.
ही निवडणूक खऱ्या अर्थाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरली होती. शिवसेना शिंदे गटाचे बडे नेते असलेल्या पाटलांनी वैशाली भावे यांच्या विजयासाठी धरणगावात स्वतः तळ ठोकला होता. प्रचंड जनसंपर्क आणि जाहीर सभांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या निकालाने त्यांच्या राजकीय रणनीतीला मोठे अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे. पालकमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच मिळालेला हा पराभव शिंदे गटासाठी चिंतेची बाब मानली जात आहे.
लिलाताई चौधरी यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होताच धरणगाव शहरात फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. तहसील कार्यालयाबाहेर जमलेल्या शेकडो समर्थकांनी “लिलाताई चौधरी तुम आगे बढो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ढोल-ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता. हा विजय धरणगावच्या विकासासाठी आणि जनतेने दिलेला परिवर्तनाचा कौल असल्याची भावना नवनिर्वाचित नगराध्यक्षा लिलाताई चौधरी यांनी व्यक्त केली आहे.



