जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील पहिल्या फेरीत आघाडीवर !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी पहिल्याच फेरीत मोठी आघाडी घेतली असून येत्या काही तासांमध्ये संपूर्ण निकाल समोर येणार आहे.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी सज्ज झाले होते. त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यानंतर महायुतीचे उमेदवार म्हणून ते रिंगणात उतरले होते. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी मंत्री गुलाबराव देवकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले. सोबतीला मनसेने पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंदा रोटे यांना उमेदवारी दिली. तरी प्रमुख मुकाबला हा दोन्ही गुलाबरावांच्या मध्येच झाला.

प्रचाराच्या दरम्यान, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस पहायला मिळाली. दोन्ही बाजूंनी हिरीरीने प्रचार केल्यामुळे येथील लढत ही अतिशय चुरशीची झाली. निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर कडाडून टिका करतांनाच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. गुलाबराव देवकरांसाठी शरद पवार व एकनाथराव खडसे यांनी तर गुलाबराव पाटलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतल्या. या मतदारसंघातून 69.33 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. यात कुणाची सरशी होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

या पार्श्वभूमिवर, आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू करण्यात आली. यात प्रारंभी टपालाने करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शासकीय अधिकारी व कर्मचारी, दिव्यांग, वयोवृध्द आदींनी केलेल्या मतदानाचा समावेश होता. या टपाली मतदानाच्या पहिल्या फेरीत गुलाबराव पाटील यांना 2861 इतक्या मतांची आघाडी मिळाली आहे. यात गुलाबराव पाटील यांना लीड मिळाल्याचे अधोरेखीत झाले आहे. तर, आता मतमोजणी यंत्रांची मतमोजणी होणार आहे. याचे अपडेट आम्ही आपल्याला देणार आहोत.

 

Protected Content