धरणगाव (प्रतिनिधी) सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे धरणगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त ५ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपयांची अशी एकूण ५ लाखाची मदत शासनाकडून मंजुर करून घेतली आहे. या पाचही कुटुंबाची भेट घेवुन राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्येकी एक – एक लाखाचे धनादेश वाटप करण्यात आले. यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मोठा आधार मिळाला आहे.
धरणगाव तालुक्यांतील साळवा येथील सुजित मोरेश्वर ढाके , विवरे येथिल ज्ञानेश्वर गोरख माळी, धार येथिल शिवाजी जगन्नाथ पाटील, चांदसर येथिल अनिल कोळी व निंभोरा येथिल चंद्रकांत संजय पाटील या ५ शेतकऱ्यांनी मागील दोन महिन्यांच्या कालावधीत आत्महत्या केली होती. या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्यक्ष घरी जाऊन तर काहींना पाळधी येथील संपर्क कार्यालय येथे प्रत्येकी एक-एक लाखाचा धनादेश शिवसेना उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते एकूण ५ लाखाचे धनादेश वाटप करण्यात आले. ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, वारसांनी मिळालेल्या मदतीमधून शक्यतोवर मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचे आवाहन केले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील, कैलास सोनवणे, धर्मेंद्र कुंभार, यासीन हाजी, उपसरपंच चंदन कळमकर,युवासेना शहर प्रमुख आबा माळी, सामाजिक कार्यकर्ते दीपक सावळे, धारचे सरपंच उत्तम सोनवणे, मुरलीधर आण्णा , सौरभ पाचपोल, तहसील कार्यलयाचे गणेश पाटील,अनिल माळी व संजय पांडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.