Home Cities यावल भारत विद्यालयात ई-पुस्तक वाचन उपक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भारत विद्यालयात ई-पुस्तक वाचन उपक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


फैजपूर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डिजिटल युगात मोबाईलचा योग्य वापर कसा करावा, याचे प्रभावी मार्गदर्शन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, न्हावी येथे घेण्यात आलेल्या ई-पुस्तक संग्रहालय उपक्रमातून करण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर ज्ञानसंपादनासाठी कसा करता येईल, याची जाणीव करून देण्यात आली.

शि. प्र. मंडळ संचलित भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, न्हावी येथे आज दिनांक २९ जानेवारी रोजी हा उपक्रम राबविण्यात आला. धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे आणि विभागप्रमुख डॉ. मनोहर सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सातवी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना मोबाईलमध्ये ई-पुस्तके संकलित करून त्याचे वाचन करण्यास प्रवृत्त करण्यात आले.

या उपक्रमात २० विद्यार्थ्यांनी विविध ई-पुस्तकांचे वाचन करून आपले वाचनकौशल्य सादर केले. वाचन स्पर्धेत वैष्णवी पुरुषोत्तम श्रीखंडे हिने प्रथम क्रमांक, तर विभूषा गिरीष ढाके हिने द्वितीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक व्हि. बी. वारके होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. मनोहर सुरवाडे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर ई-ग्रंथालय म्हणून करण्याचा सल्ला दिला. दिवसातील चोवीस तासांचे योग्य नियोजन, वेळेचा सदुपयोग आणि ‘वाचाल तर वाचाल’ हा मंत्र विद्यार्थ्यांनी अंगीकारावा, असे त्यांनी सांगितले. मोबाईलमधून ज्ञानाचा अमूल्य खजिना उपलब्ध असून त्याचा अभ्यासासाठी उपयोग करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे चेअरमन प्राचार्य डॉ. के. जी. पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रमाण मराठी भाषेत संभाषण साधावे, मोबाईलमध्ये दर्जेदार बालसाहित्य व ई-पुस्तके संग्रही ठेवावीत, असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.

अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक व्हि. बी. वारके यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. मराठी भाषेला समृद्ध आणि पुरातन इतिहास असून या भाषेतून प्रचंड ज्ञान मिळू शकते. ई-पुस्तक वाचन ही काळाची गरज असून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. जी. निकम यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. शरद बिऱ्हाडे यांनी मानले. यावेळी धनाजी नाना महाविद्यालयातील मराठी विभागाचे डॉ. दीपक सूर्यवंशी, प्रा. विजय तायडे, प्रा. पंकज बोदडे, डॉ. स्वाती महाजन, प्रा. उन्नती चौधरी, प्रा. सीमा चौधरी यांच्यासह भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound