जळगाव जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त मार्गदर्शन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त जळगाव जिल्हा कारागृहात मानवी हक्क जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र कारागृह विभागाच्या “सुधारणा व पुनर्वसन” या ब्रीदवाक्याच्या अनुषंगाने आयोजित या उपक्रमातून न्यायाधीन बंद्यांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करण्याबरोबरच पुनर्वसन आणि विधिक मदतीच्या विविध संधींबाबत माहिती देण्यात आली.

या उपक्रमाची संकल्पना महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव प्रदिपकुमार डांगे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) सुहास बारके आणि विशेष पोलीस महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनातून राबविण्यात आली. कारागृह व्यवस्थापन आणि सुधारणा प्रक्रियेतील सकारात्मक बदल घडविण्याच्या उद्देशाने हा विशेष कार्यक्रम घेण्यात आल्याचे कारागृह विभागाकडून सांगण्यात आले.

कार्यक्रमात न्यायाधीन बंद्यांना मानवी हक्क, मूलभूत संवैधानिक अधिकार, शासनाकडून उपलब्ध विधिक मदत, तसेच कारागृहातून मिळणाऱ्या पुनर्वसनाच्या संधीबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर तणाव व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास आणि समाजमुखी पुनर्वसनाचे महत्त्व यावरही विशेष मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक पुनर्वसनाच्या प्रक्रियेत स्वतःची भूमिका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करून सकारात्मक परिवर्तनासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पवन एच. बनसोड, निवासी जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक अरुण राधाकृष्ण आव्हाड, जिल्हा कारागृह अधीक्षक प्रकाश प्रतापसिंग परदेशी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण, तुरुंगाधिकारी आर. ओ. देवरे, दिलीपसिंग गिरासे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी कारागृह विभागाच्या पुनर्वसन उपक्रमांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे बंद्यांच्या मानसिक आणि सामाजिक पुनर्बांधणीस हातभार लागतो, असे मत व्यक्त केले.