जळगाव, प्रतिनिधी | येथील दी जळगाव पीपल्स को ऑप. बँक लि. तर्फे महिलांना सबला बनविण्यासाठी “रोजगार संधी” या कार्यशाळेचे यशवंतराव पाटील मुक्तांगण सभागृहात शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना स्वयंरोजगाराविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीकांत झांबरे (जिल्हा विकास प्रबंधक,नाबार्ड) यांनी यावेळी मार्गदर्शन करताना महिलांना सक्षमकरणासाठी अनुदान देणाऱ्या विविध संस्थांबद्दल मार्गदर्शन केले. जितेंद्र वर्मा व कमलेश जोशी यांनी गोल्ड लोन शाखेबद्दल माहिती देत बचत गटातील महिलांनी गोल्ड लोनबद्दल इतरांना या शाखेबदल माहिती देण्याचे आवाहन केले व त्याबद्दल प्रत्येक व्यक्ती मागे १०० रुपये कमवा असे सांगितले. अशाप्रकारे बचत गटातील महिला दर महिन्याला दोन हजार किंवा आधिक पैसेही कमवू शकतात, असेही ते म्हणाले.
डॉ. निलेश महाजन यांनी महिलांना मार्केटव्दारे पैसे कमविण्याबाबत मार्गदर्शन केले. ‘अथर्व वॉक इझी’ने आपल्याला सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळणार आहे. ती औषधी परवडेल अशा किफायतशीर किमतीत उपलब्ध आहे. या आयुवेर्दीक औषधीबद्दल माहिती देवून ते म्हणाले की, या प्रॉडकट्सची माहिती तुम्ही व्हॉटसअप व अन्य सोशल मीडियाव्दारे प्रसारीत करून रोजगार मिळवू शकता. यावेळी महिलांनीही आपल्या अडचणी सांगून शंका विचारल्या.
शुभश्री दप्तरी (अध्यक्ष सचिवालय प्रभारी-स्व.मदत गट) यांनी दिवाळीचे स्टॉल व जे.एल.जी. विषयी माहिती सांगितली. तसेच आमिता बारी व प्रतिभा येवले यांनी बचत गटातील महिलांना प्रॉडक्टविषयी माहिती दिली. यावेळी विविध बचत गटातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली बोरसे व बबीता चौधरी यांनी केले तर आभार अंजली बोरसे यांनी मानले.