जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक डास दिनानिमित्त नशिराबाद येथे आज, बुधवार २० ऑगस्ट २०२५ रोजी न्यू इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृती व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. डासांपासून पसरणाऱ्या आजारांबाबत समाजात जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना माहिती देत त्यांच्यामध्ये डास निर्मूलनाबाबत जागर निर्माण करण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद यांच्या वतीने करण्यात आले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात डॉ. करिष्मा जैन यांनी विद्यार्थ्यांना पावर पॉइंट सादरीकरणाच्या माध्यमातून डासांची निर्मिती कशी होते, डासांचे प्रकार कोणते, ते कोणकोणते आजार पसरवतात, त्या आजारांची लक्षणे, निदान व उपचार याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी विद्यार्थ्यांकडून “आपले आरोग्य, आपली जबाबदारी” या संकल्पनेवर आधारित डास निर्मूलनाची प्रतिज्ञा घेतली गेली. परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेले पाणी काढणे, डास उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजना करणे याबाबत विद्यार्थ्यांना हसत-खेळत मार्गदर्शन करण्यात आले. मुलांनी आपल्या घरी व परिसरात या माहितीचा उपयोग करून इतरांनाही जागरूक करावे, असा संदेशही देण्यात आला.
या उपक्रमासाठी न्यू इंग्लिश स्कूलचे योगेशदादा पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती बनसोडे मॅडम, सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष सहकार्य केले. तसेच आरोग्य विभागातर्फे डॉ. अजय पाल, तालुका हिवताप पर्यवेक्षक श्री. सी.एस. महाजन, आरोग्य सेवक दीपक तायडे व प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.



