Home Cities जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून नियमानुसार मदत दिली जाईल, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींमध्ये शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रुक, गारखेडा, पष्टाने बुद्रुक तसेच जळगाव तालुक्यातील करंज, धानोरा आणि धार्डी या गावांमधील नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. पालकमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि नुकसानीची माहिती घेतली.

पाहणीदरम्यान पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांनी तात्काळ तलाठी कार्यालयात आपली नावे नोंदवावीत. त्यानंतर संबंधित ठिकाणी पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करण्यात यावी, जेणेकरून मदतीची प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पार पडेल. तसेच अवकाळी पावसामुळे अनेक भागांमध्ये वीजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला असून, तुटलेल्या वीज तारा व खांबांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या व निवेदने पालकमंत्र्यांसमोर मांडली. नुकसानभरपाई, पंचनाम्यांची गती, वीजपुरवठा आणि शेतीसंबंधित अन्य अडचणींबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्र्यांनी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कोणालाही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिली. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला नियमानुसार मदत मिळेल आणि प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणी दौऱ्यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, गटविकास अधिकारी किशोर वानखेडे, तहसीलदार शीतल राजपूत, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, मंडळ अधिकारी आशिष वाघ व ज्योती चौधरी, तालुका कृषी अधिकारी के. एच. देसले, तलाठी जीवनकुमार खोकले, ज्योती लोखंडे यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound