“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमांतर्गत बेंडाळे महिला महाविद्यालयात सामुहिक वाचन !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य शासनाने १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात ‘वाचन पंधरवडा’ आयोजित करण्यात आलेला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून आज महाविद्यालयात सामुहीक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनीनी ग्रंथालयातून आपल्या आवडीची कथा, कादंबरी, चरीत्र, कविता अशी पुस्तके घेवून विद्यार्थिनीनी उत्स्फूर्तपणे सामुहीक वाचन केले.

वाचनानंतर सलोनी मावची, तेजल पाटील, सृष्टी शुक्ला, रागिणी सोनवणे, ओजस्विनी सोनवणे या विद्यार्थिनींनी मराठी साहित्यातील मार्मिक आणि विनोदी लेखन करणारे महाराष्ट्र भूषण पु.ल.देशपांडे यांच्या विनोदी लेखनाचे वाचन करून उपस्थितांना खळखळून हसवले.

महाविद्यालयाच्या मा.प्राचार्य डॉ.गौरी राणे यांनी “वाचाल तर वाचाल”…! असे वाचनाचे महत्व विद्यार्थिनीना पटवून दिले. तसेच शासनाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती विद्यार्थिनीना दिली. त्यांनी स्त्री शक्तीचा वारसा सांगताना सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्रांतीच्या संदर्भात पुण्यामध्ये घडलेल्या “बाहुलीचा हौद” या कथेचे वाचन करून विद्यार्थिनींना अंतर्मुख केले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना वाचनासाठी अवांतर पुस्तके उपलब्ध करून दिलेली असून विद्यार्थिनी मोठ्या संख्येने ग्रंथ वाचून त्याचे परीक्षण करीत आहेत. पहिल्याच दिवशी या उपक्रमास शेकडो विद्यार्थिनींनी प्रतिसाद दिला. स्पर्धेतील विजेत्यांना २६ जानेवारी रोजी पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सौ.सुनिता नारखेडे यांच्या २ ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. खानदेशातील लेवा गणबोलीचे अभ्यासक आणि प्रथितयश साहित्यिक प्रा. व. पु. होले यांचा विद्यार्थिनींना ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींशी साहित्यिक संवाद साधणार आहेत.

महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर, धांडे सभागृहात व वाचन कक्षामध्ये जवळपास ६५० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. विद्यार्थिनींसोबत सुमारे ७० शिक्षक व शिक्षकेतर सहकारी सहभागी झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.सत्यजित साळवे यांनी केले. सदर उपक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा.डॉ.व्ही.जे.पाटील, उपप्राचार्य पी.एन.तायडे, ग्रंथपाल प्रा.शिरीष झोपे, डॉ.देवेंद्र बोंडे, प्रा. दीपक पवार, कुलसचिव श्री.राकेश वाणी, ग्रंथालय समितील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेतर सहकारी यांचे सहकार्य लाभले.

Protected Content