Home प्रशासन पिंप्री फाटा ते जुनोना रस्त्याचे भूमिपूजन; ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान

पिंप्री फाटा ते जुनोना रस्त्याचे भूमिपूजन; ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान


फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पिंपरी फाटा-मंगरूळ ते जुनोना रोड या प्रमुख ग्रामीण रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडले. या भूमिपूजनामुळे या परिसरातील ग्रामस्थांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्णत्वास आली असून, त्यांच्या अपेक्षांना मूर्त स्वरूप मिळाले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. खड्ड्यांनी भरलेल्या या मार्गामुळे परिसरातील ग्रामस्थांना, विशेषतः शेतकरी आणि विद्यार्थ्यांना, दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेतमाल वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता, तर शाळा-महाविद्यालयात जाणेही अवघड झाले होते. आता हे काम सुरू झाल्याने हा रस्ता परिसरासाठी जीवनवाहिनी ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

या रस्त्यास मंजुरी मिळवण्यासाठी माजी खासदार व आमदार स्व. हरिभाऊ जावळे यांनी अथक प्रयत्न केले होते. मात्र निधी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात काम रखडले होते. त्यानंतर आमदार मा. अमोलभाऊ जावळे यांनी हा मुद्दा शासन दरबारी जोरकसपणे मांडत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश येऊन रस्त्यासाठी आवश्यक निधी मंजूर झाला आणि आज या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.

या भूमिपूजन सोहळ्यास गावकरी, पदाधिकारी, महिला व युवावर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याप्रसंगी सुरेश धनके, पद्माकर महाजन, गोमती बारेला, पी. के. महाजन, अमोल पाटील, संदीप सावळे, हरलाल कोळी, महेश पाटील, चंदू पाटील, संजू पाटील, राजन लासूरकर, वासू नरवाडे, सुनील पाटील, रवी पाटील, सूर्यकांत देशमुख, विजय महाजन, स्वप्नील सोनवणे, कैलास पाटील, विजय पाटील, अशोक पाटील, सोपान भिलाला, अनंता महाजन, प्रमोद वानखेडे, मधुकर पवार यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार अमोलभाऊ जावळे यांनी, “सामान्य माणसाच्या अडचणीला केंद्रस्थानी ठेवून काम करणे, हाच माझा संकल्प आहे,” असे प्रतिपादन केले. ग्रामविकासाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल भविष्यातील अनेक योजना आणि पायाभूत सुविधांना चालना देईल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट जाणवत होता.


Protected Content

Play sound