जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । थोर समाजसुधारक आणि स्वच्छता चळवळीचे प्रणेते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगावमध्ये गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. समाजजागृती, स्वच्छता आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या गाडगे महाराजांच्या कार्याची आठवण करत पत्रकारांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.
जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात गाडगे महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण करण्यात आले. अंधश्रद्धा, अस्वच्छता आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या या संतपुरुषांनी कृतीतून समाजप्रबोधनाचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांचे महत्त्व आजच्या काळात अधिक अधोरेखित होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. संघटनेच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला पदाधिकारी आणि पत्रकारांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.

संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी आपल्या मनोगतात गाडगे महाराजांच्या सेवाभावी वृत्तीचा विशेष उल्लेख केला. “स्वच्छता, शिक्षण आणि माणुसकीचा संदेश देणारे गाडगे महाराजांचे विचार आजच्या समाजासाठी मार्गदर्शक आहेत,” असे ते म्हणाले. संस्थापक महासचिव भगवान सोनार यांनी गाडगे महाराजांच्या सामाजिक चळवळीचा आढावा घेत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. केंद्रीय कार्याध्यक्ष सागर ओतारी यांनी समाजातील सर्व घटकांसाठी संतांनी केलेल्या कार्याचा संदर्भ देत पत्रकारांनीही जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी तितक्याच बांधिलकीने कार्य करावे, असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी संस्थापक खजिनदार ललित खरे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष दीपक कुलकर्णी, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, जळगाव तालुका सचिव योगेश सुने, जळगाव शहर उपाध्यक्ष निखिल मोरे, शहर सचिव योगेश चौधरी, लालचंद अहिरे, विकास चव्हाण, मनोज जोगी, किशोर शिंपी आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे समाजसेवा, स्वच्छता आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.



