जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांर्तगत कवयित्री बहिणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळामध्ये सुरू झालेल्या नवीन पदवी अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी शुक्रवारी विद्यापीठात घेण्यात आलेल्या “विद्यार्थी-पालक” कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेत २५० विद्यार्थी व पालकांनी सहभागी होऊन या अभ्यासक्रमांची व भविष्यातील करीअरच्या संधीची माहिती घेतली.
विद्यापीठाने या वर्षी प्रथमच अशा प्रकारची पालक व विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. विद्यापीठात व्यवस्थापन शास्त्र प्रशाळेत बी.कॉम. (बीएफएसआय), भौतिकशास्त्र प्रशाळेत बी.एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स) हे दोन नाविन्यपुर्ण चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम सुरु होत आहे. या शिवाय गतवर्षी बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स), बी.एस्सी. (मॅथेमॅटीकल सायन्स) आणि बी.ए. (सोशल सायन्स ) हे चार वर्षीय अभ्यासक्रम सुरु केले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांर्तगत हे सर्व अभ्यासक्रम सुरु आहेत. त्याची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली.
कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी विद्यापीठातील अभ्यासक्रम, सोयीसुविधा, विद्यापीठाची वाटचाल याविषयी सविस्तर सादरीकरण केले. भविष्यात ज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारीत अर्थव्यवस्था असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन करणे गरजेचे आहे. ज्ञान आणि माहिती यातील फरक लक्षात घ्यावा असे आवाहन प्रा. माहेश्वरी यांनी केले. प्रास्ताविकात प्रा.जयदीप साळी यांनी ॲप्रेंटीसशिप एम्बेंडेड प्रोग्राम हा कसा गरजेचा आहे आणि त्यामुळे उद्योगांना आवश्यक असणारे मनुष्यबळ कसे प्राप्त होणार आहेत याची माहिती दिली. इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल्स कौन्सिल ऑफ इंडीयाच्या पश्चिम विभागाचे संचालक प्रा.मंगेश मिथे यांनी या दोन्ही अभ्यासक्रमासाठी ॲप्रेंटीसशिप देण्यासाठी इलेक्टॉनिक्स सेक्टर स्किल्स कौन्सिल ऑफ इंडिया कटीबध्द असल्याचे सांगून सविस्तर माहिती दिली.
प्रा. रमेश सरदार यांनी बी.कॉम. (बीएफएसआय) अभ्यासक्रमाची उपयुक्तता विषद केली. विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे यावेळी निरसन करण्यात आले. मंचावर प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, अधिष्ठाता प्रा.अनिल डोंगरे, व प्रा.जगदीश पाटील, व्य.प. सदस्य डॉ.पवित्रा पाटील, कुलसचिव डॉ.विनोद पाटील उपस्थित होते. प्रा.व्ही.एम.रोकडे यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले. प्रा.सतिश कोल्हे यांनी आभार मानले.