जळगाव प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार १५ वर्षांवरील मुला-मुलींच्या लसीकरणासाठी शनिवारपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आज सकाळपासून प्रत्यक्षात लसीकरणास प्रारंभ झाला असून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
कोरोनावर लसीकरण आणि नियमांचे पालन हेच महत्वाचे आयुध असल्याचे आजवर दिसून आले आहे. आता कोविडच्या ओमायक्रॉन आवृत्तीचा प्रकोप होण्याची धास्ती व्यक्त होत असतांना १५ वर्षावरील मुलामुलींचे सुरू करण्यात आलेले लसीकरण हे अतिशय महत्वाचे आहे. प्रत्येक पालकाने या वयोगटातील आपल्या मुलांची नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शहरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज रूग्णालयात मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ झाल्यानंतर ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार शनिवारपासून १५ वर्षांवरील मुला-मुलींच्या लसीकरणासाठी शनिवारपासून नोंदणी सुरू करण्यात आली असून आज सकाळपासून प्रत्यक्षात लसीकरणास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आज सकाळी महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले. विशेष बाब म्हणजे जिल्हा प्रशासनाने पहिल्यांना शासकीय निरिक्षणगृहातील मुले आणि मुलींना पहिल्यांदा लस दिली. यानंतर नोंदणी केलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना लस देण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कोरोनाच्या प्रतिकारासाठी लसीकरण हे सर्वात महत्वाचे आहे. ज्यांनी आजवर पहिला अथवा दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, तर ज्येष्ठांना लवकरच बुस्टर डोस मिळणार असून या संदर्भात लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. आता पंधरा वर्षावरील वयोगटातील मुलामुलींचे लसीकरण करण्यात येत असून यासाठी जिल्हा प्रशासनाने अचूक नियोजन केले असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाकडे सध्या तरी पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध असून याचा तुटवडा भासू नये म्हणून प्रशासन दक्ष आहे. यासोबत लोकांनी नियम पाळण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सुध्दा पालकमंत्र्यांनी याप्रसंगी केले.