जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल-रावेर तालुक्यातील नागरिकांना ‘मोतीबिंदूमुक्त’ करण्याच्या उद्दिष्टाने आमदार अमोल जावळे यांनी आरोग्य उपक्रमाला दिलेला वेग सकारात्मक परिणाम देत आहे. या उपक्रमाअंतर्गत रविवारी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागात तब्बल 20 ज्येष्ठ आणि गरजू रुग्णांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सर्व रुग्णांना उपचार पूर्ण झाल्यावर डिस्चार्ज देण्यात आला.
या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या असून, रुग्णांना घरी पोहोचण्यासाठीही विनामूल्य सोय उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे उपचार घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह त्यांच्या कुटुंबीयांनी या मानवतावादी उपक्रमाबद्दल मोठ्या समाधानाची भावना व्यक्त केली. समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न प्रत्यक्षात यशस्वी होत असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट दिसले.

या यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात नेत्रविभागातील तज्ञ डॉक्टरांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. डॉ. प्रवीण पाटील, डॉ. दिव्या सोनवणे, डॉ. सोबिया अन्सारी, डॉ. स्वाती असोले, डॉ. मयुरी राठोड, डॉ. प्रियांका पाटील, डॉ. विवेक सोलंकी, डॉ. मयुरेश डोंगरे यांच्यासह परिसेविका सुनिता वक्ते, भाग्यश्री ढाकणे, सागर कोळी आणि मयुरी हिवरे यांनी शस्त्रक्रिया प्रक्रियेपासून ते रुग्ण व्यवस्थापनापर्यंत मोलाची जबाबदारी सांभाळली. तसेच मंत्री गिरीश महाजन वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे आरोग्यदूत पै. शिवाजी रामदास पाटील यांनीही मोठा सहभाग नोंदवला.
या उपक्रमाबद्दल बोलताना आमदार अमोल जावळे म्हणाले की, “गरीब आणि दुर्बल कुटुंबांतील अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणीमुळे नेत्र उपचार मिळणे अवघड जाते. या मोफत शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या आयुष्यात पुन्हा दृष्टीचा प्रकाश परतला आहे. ‘मोतीबिंदूमुक्त यावल-रावेर तालुका’ हे आमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भविष्यातही अशा सेवा शिबिरांचे नियमित आयोजन करण्यात येईल.”



