मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि असंख्य कार्यकर्त्यांचे आधारस्थान असलेल्या अजितदादांच्या निधनामुळे राजकीय क्षितिजावरील एक तारा निखळला आहे. या दुःखद घटनेवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दादांच्या जाण्याने केवळ एका पक्षाची नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात त्यांनी आपला शोक व्यक्त केला.

आपल्या राजकीय प्रवासातील सुरुवातीच्या आठवणींना उजाळा देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मी जेव्हा पहिल्यांदा अपक्ष म्हणून आमदारकीची निवडणूक लढवली, तेव्हा अजितदादांनी मला मोठे सहकार्य केले होते. माझ्या त्या पहिल्या विजयात आणि राजकीय वाटचालीत दादांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेली साथ मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.”

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, दादांचे नेतृत्व हे सर्वसमावेशक आणि मदतीचा हात देणारे होते. त्यांच्या जाण्याने मी माझा एक मार्गदर्शक गमावला आहे. अजितदादांच्या कार्याचा वारसा महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. “ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो,” अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली. दादांच्या निधनाने संपूर्ण मतदारसंघात आणि राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.



