Home क्राईम कुऱ्हाडी हल्ल्यातील जखमी आजीचा उपचारदरम्यान मृत्यू !

कुऱ्हाडी हल्ल्यातील जखमी आजीचा उपचारदरम्यान मृत्यू !


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी घेतलेल्या कर्जावरून झालेल्या वादातून नातवाने आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची धरणगावातील घटना आता खुनात बदलली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लिलाबाई रघुनाथ विसपुते (वय ७०, रा. महाबळ) यांचा पुणे येथे उपचार सुरू असताना ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणी धरणगा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आता खुनाचे कलम वाढविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अधिक माहिती अशी की, शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतल्याने लिलाबाई विसपुते यांनी नातू तेजस विलास पोतदार (रा. धरणगाव) याला रागवले होते. यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते. २६ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास तेजस आणि लिलाबाई यांच्यात शेअर मार्केटच्या कर्जावरून पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. याच वादातून तेजसने बेडरूममध्ये झोपलेल्या आजी लिलाबाई यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते.

वार केल्यानंतर तेजसने आजीवर कोणीतरी हल्ला केल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून तेजसनेच हा हल्ला केल्याचे उघड केले होते. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लिलाबाई यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुणे येथे हलवण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना ८ जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने धरणगाव परिसरात खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound