Home धर्म-समाज फैजपूर येथे भव्य तुळशी अर्चन व नामसंकिर्तन महोत्सव उत्साहात

फैजपूर येथे भव्य तुळशी अर्चन व नामसंकिर्तन महोत्सव उत्साहात


फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीसारख्या महान ग्रंथाची निर्मिती केली असून त्या ग्रंथनिर्मितीसाठीच त्यांनी अवतार धारण केला. मात्र हरिपाठ ग्रंथाची रचना पूर्ण झाल्यानंतर माऊलींच्या मनाला खरे मनस्वी समाधान प्राप्त झाले, असे भावपूर्ण प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील कीर्तनकार जगदीश महाराज जोशी यांनी केले.

फैजपूर येथे सुरू असलेल्या भव्य तुळशी अर्चन व नामसंकिर्तन महोत्सवात पहिल्या कीर्तन सत्रात ते बोलत होते. सुमारे सहा एकर क्षेत्रात उभारलेल्या भव्य कथा मंडपात उत्साहपूर्ण वातावरणात सामूहिक तुळशी अर्चन कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने सुरू आहे.

यानंतर दुसऱ्या सत्रात पूज्य शैलेंद्रजी शास्त्री यांनी प्रवचन करताना प्रभूची कथा ऐकण्यासाठी भाग्य लागते. कथा श्रवणाने मानवाच्या जीवनातील व्यथा दूर होतात, त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील युवकांनीही ही कथा आवर्जून ऐकावी, असे आवाहन केले. भारत देशाचे महत्त्व विशद करताना त्यांनी सांगितले की, भारत हे विश्वातील एकमेव महान तीर्थक्षेत्र असून येथे असंख्य पवित्र तीर्थस्थाने आहेत. कलियुगात केवळ नामचिंतन व नामसाधनाच फलदायी असून नामजपाने जीव पापमुक्त होतो व नामसाधनेने सर्व काही प्राप्त होते.

या धार्मिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावून नामस्मरण व तुळशी अर्चनाचा लाभ घेतला.
दरम्यान, दि. ६ रोजी सुप्रसिद्ध कीर्तनकार अनिल महाराज बार्शीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound