Home Cities यावल यावलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन 

यावलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिर आणि बाल संस्कार माध्यमिक विद्यालय येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, दिनांक २८/०२/२०२६ रोजी पार पडलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एम. गर्गे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून यावल नगरपालिकेचे शिक्षण सभापती तथा नगरसेवक पराग सराफ उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विज्ञान विषयावरील कुतूहल आणि प्रयोगशीलता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

या विज्ञान प्रदर्शनात एकूण ५३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत ३४ विविध मॉडेल्स सादर केली. जलचक्र, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, स्मार्ट फायर फायटर वाहन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, थ्रीडी होलोग्राम बॉक्स, अर्थक्वेक डिटेक्टर, चंद्रयान, ऑब्लिक स्पीड ब्रेकर, पवनचक्की, वायु व ध्वनी प्रदूषण यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी सर्जनशील आणि माहितीपूर्ण प्रात्यक्षिके मांडली. विशेष म्हणजे इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनीही स्वतःचे विज्ञान मॉडेल तयार करून उपस्थितांचे कौतुक मिळवले.

इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्यामुळे प्रदर्शनात विविध वयोगटांतील कल्पकता पाहायला मिळाली. संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी, शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी सर तसेच पालकांनी प्रदर्शनाला भेट देत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. विज्ञान शिक्षक ललित चौधरी, नितीन बारी आणि सविता वारके यांनी मॉडेल्सचे परीक्षण करून विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता पाचवीतील जान्हवी अतुल पवार हिने प्रभावीपणे केले. प्रस्तावना इयत्ता सातवीतील तनुष्का इंगळे हिने मांडली, तर पाहुण्यांचा परिचय इयत्ता सहावीतील यज्ञेश बाविस्कर यांनी करून दिला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound