
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय वातावरणात मोठी उष्णता निर्माण झाली आहे. आज, सोमवार ५ जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडून प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. सकाळी १० वाजता रायसोनी नगर परिसरातून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत…

प्रभागात महायुतीचे शक्तीप्रदर्शन :
प्रभाग क्रमांक १३ मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार नितीन प्रभाकर सपके (१३ अ – भाजप), सुरेखा नितीन तायडे (१३ ब – भाजप) आणि प्रफुल्ल गुलाबराव देवकर (१३ ड – राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी एकत्र येत प्रचाराला सुरुवात केली. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे संपूर्ण परिसर निवडणूक मय झाला होता.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती :
या प्रचार मोहिमेला बळ देण्यासाठी जळगावचे आमदार राजूमामा भोळे आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर स्वतः मैदानात उतरले होते. त्यांच्यासोबत विशाल देवकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोकुळ चव्हाण, संचालक युवराज सपकाळे, जिल्हा सरचिटणीस संजय चव्हाण यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मतदारांशी थेट संवाद :
उमेदवारांनी रायसोनी नगर आणि परिसरातील घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी नागरिकांनी आपल्या भागातील रस्ते, पाणी आणि स्वच्छतेच्या समस्या उमेदवारांसमोर मांडल्या. मतदारांशी संवाद साधताना उमेदवारांनी आश्वासन दिले की, “आम्हाला सेवेची संधी मिळाल्यास प्रभागातील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील आणि एक आदर्श प्रभाग म्हणून या भागाचा विकास केला जाईल.”
ठिकठिकाणी स्वागत आणि औक्षण :
प्रचारादरम्यान महायुतीच्या उमेदवारांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी गृहिणींनी उमेदवारांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. मतदारांचा हा वाढता पाठिंबा पाहता, प्रभाग १३ मध्ये महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.



