Home धर्म-समाज महर्षी व्यास मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन

महर्षी व्यास मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यावल येथील महर्षी व्यास मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी, १० जुलै रोजी होणाऱ्या या कार्यक्रमांसाठी जिल्ह्यातील हजारो भाविक महर्षींच्या दर्शनासाठी यावलमध्ये हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा:
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महर्षी व्यास मंदिरात सकाळी ८ वाजता महापूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर, सकाळी ११ ते सायंकाळपर्यंत महाप्रसादाचे वाटप केले जाईल. यासोबतच, येथील श्री संत जनार्दन स्वामी ध्यान मंदिरात पहाटे ५ वाजता ब्रह्म वृंदाच्या हस्ते महापूजा, दुग्धाभिषेक, पादुका पाद्यपूजन आणि ध्वजारोहण केले जाईल. दुपारी साडेबारा वाजल्यानंतर येथेही महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

महर्षी व्यास मंदिराची आख्यायिका:
यावल येथील महर्षी व्यास मंदिराला एक प्राचीन आणि समृद्ध इतिहास आहे. दंतकथेनुसार, महाभारत काळात महर्षी व्यासांनी यावल येथे काही काळ वास्तव्य केले होते आणि महाभारतातील काही पर्व त्यांनी येथेच लिहिले होते. प्राचीन काळी यावल तालुक्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वताचे घनदाट जंगल भुसावळच्या तापी नदीपात्रापर्यंत पसरलेले होते असे सांगितले जाते. सध्याच्या हरडकाई-खडकाई नद्या म्हणजेच पूर्वीच्या हरिता-सरिता नद्या होत्या. या नद्यांच्या संगमानंतर सूर नदी दक्षिणवाहिनी होते. शहराबाहेर याच नदीच्या काठावरील टेकडीवर लोमेश ऋषींचा आश्रम होता.

एका प्रसंगी लोमेश ऋषींनी महर्षी व्यासांच्या हस्ते यज्ञ करण्याचे ठरवले होते. त्याच वेळी अज्ञातवासातून हस्तिनापुराकडे परतत असलेल्या पांडवांनी यावल येथील लोमेश ऋषींच्या आश्रमात काही काळ विसावा घेतला होता. परत जाताना लोमेश ऋषींनी महर्षी व्यासांना पांडवांच्या हस्ते यज्ञाचे निमंत्रण दिले. त्यानुसार महर्षी व्यास येथे आले आणि त्यांच्या हस्ते यज्ञ पार पडला. त्यानंतर महर्षींनी काही काळ याच परिसरात घालवला अशी दंतकथा आहे. त्यांच्या वास्तव्यात त्यांनी महाभारताची काही पर्व येथे लिहिली असेही सांगितले जाते.

महर्षी व्यास हे सप्त चिरंजीवांपैकी एक असल्याने, ते आजही या भूमीत वावरत असल्याचे परिसरातील भाविकांची तीव्र भावना आहे. महर्षींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीत त्यांचे भव्य मंदिर असल्याने दरवर्षी गुरुपौर्णिमेला येथे मोठ्या यात्रेचे आयोजन केले जाते. यात्रेला जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून महर्षींच्या चरणी लीन होतात.


Protected Content

Play sound