जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्या वतीने ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित भव्य कार्यक्रमाने पोलीस कवायत मैदान देशभक्तीच्या सुरांनी गुंजून गेले. या सामूहिक गीतगायन सोहळ्यात ५ हजारांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नवनीत चव्हाण, तहसीलदार श्रीमती शीतल राजपूत तसेच प्रमुख वक्ते म्हणून अशोक पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकारी आणि विभागप्रमुखही सहभागी झाले होते.

‘वंदे मातरम्’ गीताचे सुमधुर गायन संगीत शिक्षक वरूण नेवे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. या भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांना देशप्रेमाच्या भावनांनी भारावून टाकले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारित एक छोटी नाटिका सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमातील पाहुण्यांचे स्वागत आणि आभार संस्थेचे प्राचार्य वाय. के. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व गटनिर्देशक, निदेशक कार्यालयातील कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे शहरातील तरुणाईत राष्ट्रप्रेम, एकता आणि सांस्कृतिक अभिमानाची भावना दृढ झाली आहे. ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित हा उपक्रम जळगावच्या सांस्कृतिक आणि देशभक्तिपूर्ण परंपरेचा भव्य साक्षीदार ठरला.



