Home प्रशासन यावलमध्ये होमगार्डच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य पथसंचलन

यावलमध्ये होमगार्डच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य पथसंचलन

0
115

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथे होमगार्डच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भव्य पथसंचलनासह वृद्ध, गरजू आणि आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात आलेल्या सामाजिक कार्यक्रमांमुळे होमगार्डच्या सेवाभावी कार्याचा आदर्श नागरिकांसमोर मांडण्यात आला.

अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड अशोक नखाते यांच्या आदेशान्वय आणि प्रशासकीय अधिकारी रामनाथ काळे, केंद्रनायक गंगाधर महाजन, सामग्री प्रबंधक सुभेदार मदन रावते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समादेशक अधिकारी विजय जावरे यांच्या नेतृत्वाखाली ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त हे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले.

वर्धापन दिनानिमित्त यावल शहरातून होमगार्ड जवानांचे शिस्तबद्ध आणि भव्य पथसंचलन काढण्यात आले. या पथसंचलनातून शिस्त, सेवा आणि सज्जता यांचा संदेश देण्यात आला. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पथसंचलनाचे कौतुक करत होमगार्ड जवानांना सलामी दिली.

समाजहिताच्या दृष्टीने यशोदायी फाउंडेशन वृद्धाश्रम येथे वृद्ध व्यक्तींना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले तसेच त्यांना अल्पोपहार देण्यात आला. याशिवाय आदिवासी पाड्यावर गरजू महिला व पुरुषांना थंडीचे ब्लॅंकेट आणि फळांचे वाटप करण्यात आले. लहान मुलांसाठी खाऊ वाटपाचा कार्यक्रमही घेण्यात आल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

हे सर्व उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तालुका समादेशक अधिकारी विजय जावरे यांच्यासह वरिष्ठ पलटण नायक पंकज फिरके, अनायुक्त अधिकारी ज्योती बारी, भगवान पाटील, संगीता पाटील, अर्चना कोळी, निशा कदम, कैलास लावणे, टेकचंद फेगडे, प्रवीण तेली, सोनल कोणी, मुमताज चिखलीकर, रऊफ खान, वसीमदिन, सागर पाठक, अशोक बडगुजर, संतोष बारी, संदीप कोळी तसेच महिला व पुरुष होमगार्ड जवानांनी मोलाचे सहकार्य केले.

एकूणच, यावल येथे साजऱ्या झालेल्या होमगार्डच्या ७९ व्या वर्धापन दिनामुळे सेवा, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश सर्वदूर पोहोचला असून नागरिकांमध्ये होमगार्डबद्दलचा विश्वास आणि आदर अधिक दृढ झाला आहे.


Protected Content

Play sound