Home Cities जामनेर पहूर येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रोत्सवाचे आयोजन

पहूर येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रोत्सवाचे आयोजन


पाळधी, ता. जामनेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथे देवळी व गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रोत्सव आणि अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानात दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिरसाचा महापूर उसळणार आहे.

गेल्या वीस वर्षांपासून या ठिकाणी अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आणि शिवमहापुराण कथेचे आयोजन केले जाते. यंदा सप्ताहाचे २१ वे वर्ष असून दि. १२ फेब्रुवारीपासून या धार्मिक सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. नामवंत कीर्तनकारांच्या प्रभावी कीर्तनसेवेने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. सप्ताहादरम्यान दररोज विविध कीर्तनकारांच्या उपस्थितीत हरिनामाचा गजर होणार आहे.

दि. १२ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. पंढरीनाथ महाराज (कोऱ्हाळा बाजार) यांच्या कीर्तनाने सप्ताहाची सुरुवात होईल. दि. १३ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज (चिंचखेडा), दि. १४ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. अश्विनीताई महाराज (पहूर) कीर्तनसेवा देतील. दि. १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त विशेष कीर्तन ह.भ.प. विष्णुदास महाराज (चिंचखेडा) यांच्या हस्ते होणार आहे. दि. १६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. जान्हवी दीदी महाराज (सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर), दि. १७ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. वैष्णवी दीदी महाराज (बुलढाणा) तर दि. १८ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. फकीरा महाराज (जामनेर) कीर्तनसेवा सादर करतील.

दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी सकाळी ९ वाजता ह.भ.प. बाबुरावजी महाराज पहुरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप होणार आहे. त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून यात्रोत्सवाची सांगता होईल. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात दुग्धाभिषेकाचा धार्मिक विधी पार पडणार आहे. त्याच दिवशी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ग्रामपंचायत सदस्य तथा मंदिराचे विश्वस्त अशोक जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

स्वर्गीय सुशीला आई राऊत यांच्या स्मरणार्थ ह.भ.प. सुरेश राऊत यांच्या वतीने शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमामुळे पहूर परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

यात्रोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज, उपाध्यक्ष प्रदीप लोढा, सचिव हरिभाऊ राऊत, विश्वस्त अशोक जाधव, किशोर बनकर, आकाश बनकर, दिलीप पाटील, संजय गोतमारे, सुरेश राऊत, ईश्वर हिवाळे, शंकर भामेरे यांच्यासह सर्व विश्वस्त, ग्रामस्थ व भाविक परिश्रम घेत आहेत. ट्रस्टच्या वतीने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

देवळी व गोगडी नद्यांच्या संगमावर वसलेले हे प्राचीन देवस्थान ऐतिहासिक महत्त्वाचे मानले जाते. सन १९९१ मध्ये पूजारी शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी लोकसहभागातून ४२ दिवसांचे मौनव्रत अनुष्ठान करून मंदिराचा जिर्णोद्धार केला. सन २००६ मध्ये धर्मदाय कार्यालयात मंदिराची ई–१०८६ क्रमांकाने नोंदणी झाली असून ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर व परिसराचा सातत्याने विकास केला जात आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पर्यटन विकास मंत्रालयाकडून सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. या कार्यासाठी सरपंच आशाताई जाधव यांच्यासह ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.


Protected Content

Play sound