जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नांदेड येथे होणाऱ्या गुरु तेग बहादूर सिंह यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी समागमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंद दी चादर’ या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसाराला जामनेर तालुक्यातून अधिकृत सुरुवात करण्यात आली. या निमित्ताने कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या प्रचार रथाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

२४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या हिंद दी चादर कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून रामेश्वर नाईक यांची जबाबदारी असून, या कार्यक्रमाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी, यासाठी जामनेर तालुक्यात प्रचार रथ फिरवण्यात येणार आहे. या प्रचार रथाचे पूजन व शुभारंभ राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी करण्यात आला.

भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर आणि ज्येष्ठ नेते जे. के. चव्हाण यांच्या हस्ते विधिवत पूजन करून प्रचार रथाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुरु तेग बहादूर सिंह यांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा प्रसार समाजात होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी बंजारा लबाना समाजाचे बांधव, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार रथाच्या माध्यमातून गुरु तेग बहादूर यांच्या शौर्य, त्याग आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती गावोगावी पोहोचवली जाणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
जामनेर तालुक्यातून सुरू झालेला हा प्रचार उपक्रम नांदेडमधील भव्य समागमासाठी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करणार असून, समाजातील विविध घटकांमध्ये या ऐतिहासिक कार्यक्रमाबाबत जागृती निर्माण करण्याचा उद्देश त्यामागे आहे.



