Home Cities जळगाव सीबीएसई क्लस्टर नाइंथ कबड्डी स्पर्धेचा भव्य शुभारंभ  

सीबीएसई क्लस्टर नाइंथ कबड्डी स्पर्धेचा भव्य शुभारंभ  


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावातील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल येथे सीबीएसई क्लस्टर नाइंथ कबड्डी स्पर्धा (२०२५-२६) चा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने पार पडला. या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात महाराष्ट्र, गोवा तसेच दीव-दमण येथील एकूण ३६ सीबीएसई शाळांमधून ६३ संघ आणि सुमारे ८०० खेळाडूंनी सहभाग घेतल्याने क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या योगा डान्स सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. मुख्य पाहुण्यांच्या हस्ते सीबीएसई ध्वजारोहण पार पडले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि माजी क्रिकेटपटू शिवप्रसाद पुरोहित यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली, तर शपथविधीही पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.

या भव्य कार्यक्रमाला जिल्हाधिकारी  आयुष प्रसाद, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, सीबीएसई परीक्षक फैजल शेख, शहर समन्वयिका सुषमा कंची, माजी नगरसेवक नितीन बरडे, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, सचिव विनोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र नन्नवरे यांनी करताना खेळाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात भरत अमळकर यांनी विद्यार्थ्यांना संघभावना व खेळाडूवृत्ती जोपासण्याचे मोल सांगितले. याशिवाय मोबाईलच्या वापराबाबतही सजग राहण्याचा सल्ला दिला.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून देत, या स्पर्धेच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढवण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सौ. चित्रा पाटील यांनी तर पाहुण्यांचा परिचय सौ. अश्विनी बाविस्कर यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय समितीच्या अध्यक्षा सौ. हेमाताई अमळकर, प्रशासकीय अधिकारी दिनेश ठाकरे आणि वाहन विभाग प्रमुख मिलिंद पुराणिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क, नेतृत्वगुण आणि खेळाडूपणाची भावना विकसित होणार आहे. विवेकानंद प्रतिष्ठानच्या विविध शाखांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अनेक सीबीएसई शाळांचे मुख्याध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कबड्डीचा थरार आणि स्पर्धेचा जोश अनुभवण्यासाठी क्रीडाप्रेमींसाठी हे पर्व एक पर्वणीच ठरणार आहे.


Protected Content

Play sound