जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग, दिंडोरी प्रणीत जानकी नगरातील स्वामी समर्थ केंद्र पालखी ग्रुपच्या वतीने जळगाव ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पाई पालखी सोहळ्याचे गुरुवारी, 20 मार्च रोजी सकाळी 8 वाजता भव्य प्रस्थान करण्यात आले. या शुभ प्रसंगी जानकी नगर केंद्रात विधिवत पूजन करून पालखीचे स्वागत करण्यात आले. जळगाव शहरातील विविध भागांमध्ये पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत व पूजन करण्यात आले. यावेळी जानकी नगर आणि परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांसह पुरुष भाविकांच्या उस्फूर्त उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
जळगाव ते त्र्यंबकेश्वर पाई पालखी सोहळा हा विशेष महत्त्वाचा असून, हा सोहळा दिंडोरी प्रणीत मार्गातील पहिली पालखी आहे. हा सोहळा 12 दिवसांचा असून, 20 मार्च रोजी सुरू झालेली ही पालखी 31 मार्च रोजी त्र्यंबकेश्वर येथे पोहोचणार आहे. या पालखीच्या प्रवासात 12 प्रमुख गावांमध्ये थांबे असतात. या गावांमध्ये पाडदी, धरणगाव, अंमळनेर, धुळे यांसह इतर ठिकाणांचा समावेश आहे. या पालखी सोहळ्यात सेवेकरी विविध सामाजिक उपक्रम राबवतात. यात्रेच्या दरम्यान पक्षांसाठी पाणी व खाद्य पुरवले जाते तसेच वृक्षारोपणाचा महत्वपूर्ण उपक्रमही हाती घेतला जातो. पर्यावरण जपण्याच्या उद्देशाने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते.
या पाई पालखी सोहळ्यात जानकी नगर केंद्रातून जवळपास 100 ते 150 सेवेकरी सहभागी होतात. तब्बल 365 किलोमीटरचा हा पायी प्रवास ते निस्वार्थ भावनेने पार पाडतात. या सोहळ्याचे प्रमुख समन्वयक प्रवीण आत्माराम देशमुख असून, त्यांच्यासोबत शैलेंद्र ठाकूर, शेखर, दीपक पाटील, अमोल भाऊ, गोपाल भाऊ, तसेच आव्हाण्याचे बाबा आणि अनेक सेवेकरी या सेवेत सहभागी होतात. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे जळगाव ते त्र्यंबकेश्वर पाई पालखी सोहळा यशस्वीरीत्या संपन्न होत असतो. या पालखी सोहळ्याला तब्बल 90 वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. श्री स्वामी समर्थांच्या सेवेत समर्पित भाविक आणि सेवेकरी हे सोहळा मोठ्या श्रद्धेने पार पाडतात. भाविकांच्या अढळ श्रद्धेमुळे हा सोहळा दरवर्षी अधिक भव्य स्वरूपात संपन्न होत आहे. जळगाववासीयांसाठी ही पालखी मोठ्या धार्मिक व आध्यात्मिक महत्त्वाची असून, शहरातील भाविक मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यात सहभागी होत असतात.
खाली पहा याबाबतचा व्हिडिओ :