मुंबईतील महायुतीची बैठक रद्द; शिंदे अचानक मूळगावी रवाना

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात सत्ता स्थापनेचा पेच असताना मुंबईतील महायुतीची बैठक अचानक रद्द करण्यात आली. त्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या मूळगावी साताऱ्याला रवाना झाले आहेत. नुकतीच एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाच्या खात्यांचे वाटपाबाबत सर्व काही निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईत आज महायुतीची बैठक होणार होती. मात्र, काही कारणास्तव ही बैठक रद्द करण्यात आली. महायुतीचा शपथविधी सोहळा २ डिसेंबर रोजी पार पडण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आपल्या सातारा गावाकडे रवाना झाले आहेत. शिंदे परतल्यानंतर आता ही बैठक होणार आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या आजच्या सर्व भेटी रद्द करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सत्तास्थापनेबाबतची चर्चा सकारात्मक दिशेने सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे साताऱ्यातील महाबळेश्वरजवळील दारा या मूळगावी गेले आहेत.

याआधी स्वत: एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत भाजप कोणालाही मुख्यमंत्री बनवेल, त्याला हरकत नाही, असे सांगितले. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, हे जवळपास निश्चित झाले. अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महायुतीत सर्वकाही ठिक असल्याचे सांगितले. मुंबईतील बैठकीनंतर राज्यातील पुढील मुख्यमंत्र्यांची घोषणा होईल, असेही ते म्हणाले होते.

Protected Content