Home Cities जळगाव जळगावात भव्य 24 फुटांची गुढी ठरली आकर्षण; महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते...

जळगावात भव्य 24 फुटांची गुढी ठरली आकर्षण; महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते पूजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  हिंदू नववर्षाच्या शुभारंभाचे प्रतीक असलेल्या गुढीपाडवा सणानिमित्त जळगावातील भूषण कॉलनीत यंदा 24 फूट उंचीची भव्य सार्वजनिक गुढी उभारण्यात आली असून, या आकर्षक गुढीने परिसरात विशेष लक्ष वेधून घेतले. गौरी मंथन फाऊंडेशनच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमामुळे नववर्षाचे स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

या भव्य गुढीचे पूजन जळगाव महानगरपालिकेच्या महापौर सौ. दीपमाला काळे यांच्या हस्ते पार पडले. पारंपरिक विधी, मंत्रोच्चार आणि उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या सोहळ्याने परिसरात नवचैतन्य निर्माण झाले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमादरम्यान माधुरी खडके, वंदना लिंगायत, विद्या अत्तरदे, गौरी लिंगायत, नंदिनी अत्तरदे, उज्वला झोपे, वैशाली नारखेडे, कुंदा नेहेते, प्रतिभा नेहेते, कस्तुराबाई बारी, हेमंत खडके आणि संजीव पिंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत नववर्षाच्या स्वागताचा आनंद साजरा केला.

गौरी मंथन फाऊंडेशनच्या या उपक्रमामुळे परिसरात एकजूट, परंपरा आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दुर्गाप्रसाद पाटील, जगदीश पाटील आणि तुकाराम माळी यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound