राजूरे येथील ग्रामपंचायत सदस्य अपात्र; जिल्हाधिकारी यांचे आदेश

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील राजूरे गावातील ग्रामपंचायत सदस्य श्रावण काशिनाथ धाडे यांनी अपत्यांची माहिती लपविल्यामुळे तसेच मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र घोषीत केले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील राजूरे येथील ग्रामपंचायत सदस्य श्रावण काशिनाथ धाडे यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यांनी २८ ऑक्टोबर २०२३ रोजी राखीव जागेवर ग्रामपंचायत सदस्य म्हणून नियुक्ती मिळवली होती. मात्र, नामनिर्देशन पत्र दाखल करताना त्यांच्या तीन अपत्यांपैकी केवळ दोनच अपत्यांची माहिती दिली आणि तिसऱ्या अपत्याची माहिती लपवली होती. या प्रकरणी अशोक भोलाणकर, राहुल रोटे आणि योगेश कांडेलकर यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत, श्रावण धाडे यांनी राखीव प्रवर्गातून निवडून येऊन मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले नसल्याचाही आरोप करण्यात आला होता.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीया प्रकरणाची चौकशी केल्यानंतर श्रावण धाडे यांना शुभांगी, गणेश आणि स्नेहल अशी तीन अपत्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे, त्यांनी तिसऱ्या अपत्याची माहिती लपवून गैरमार्गाने ग्रामपंचायत सदस्य पद मिळवल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला. याप्रकरणी, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (ज-१) आणि कलम १० (१-अ) नुसार, श्रावण धाडे यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. दोन्ही तक्रारींनुसार कारवाई करून अपात्रता जाहीर झाल्याने ग्रामपंचायत सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Protected Content