मुंबई वृत्तसंस्था । महासेना आघाडीचे नेते ओल्या दुष्काळासंदर्भात आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार होते. मात्र राज्यपालांची भेट अचानक रद्द झाली असून ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे. यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी निश्चित केलेली आजची राज्यपालांची भेट रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.
शिवसेना विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्यावतीनेही या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते आणि आमदार सध्या ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. नुकसानीचे पंचनामे वेगाने व्हावेत यासाठी सर्वांचे प्रयत्न आहेत. त्याचवेळी निवडणूक खर्चाचा तपशील आणि अन्य बाबींची पूर्तता करायची असल्याने मतदारसंघात थांबावे लागले आहे. त्यामुळेच आजची राज्यपालांची नियोजित भेट तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत राज्यपालांची नव्याने वेळ घेऊन भेट घेण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे नेते राज्यपालांची राजभवनात भेट घेणार अशी माहिती शुक्रवारी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी दिली होती.