Home Cities मुक्ताईनगर आ. एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्यानंतर सरकारचा निर्णय; केळी उत्पादकांना मोठा आर्थिक आधार

आ. एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्यानंतर सरकारचा निर्णय; केळी उत्पादकांना मोठा आर्थिक आधार


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  रावेर तालुक्यातील सावदा महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सन २०२४-२५ च्या आंबिया बहार हंगामासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना तब्बल ११.०७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली असून ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली. आ. एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली.

विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित करताना आ. एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, रावेर तालुक्यातील सावदा मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२४ मध्ये हवामान आधारित फळपीक विमा काढला होता. नियमानुसार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत विम्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते. मात्र १३ डिसेंबर २०२५ पर्यंतही सावदा मंडळातील शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळाली नसल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे नुकसानभरपाई तत्काळ मंजूर करून संबंधित विमा कंपन्यांवर जबाबदारी निश्चित करावी तसेच सावदा, उदळी, तांदलवाडी व परिसरातील बाधित शेतकऱ्यांना व्याजासह विमा रक्कम मिळावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

यावर उत्तर देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये सावदा महसूल मंडळातील १६२२ नुकसानग्रस्त व पात्र शेतकऱ्यांसाठी एकूण ११,०७,२६,२७८ रुपये इतकी नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्रतेची प्रक्रिया पूर्ण झाली असून निधी वितरणाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

विमा रकमेच्या विलंबाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, भारतीय कृषी विमा कंपनीकडून (AIC) आवश्यक निधीची मागणी नोव्हेंबर २०२५ अखेरीस प्राप्त झाली आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून निधी वितरीत करण्याची तांत्रिक प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने विमा भरपाई जमा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आ. एकनाथराव खडसे यांनी सावदा, उदळी आणि तांदलवाडी परिसरातील बाधित केळी उत्पादकांच्या प्रलंबित विमा प्रकरणाकडे तारांकित प्रश्नाद्वारे सरकारचे लक्ष वेधल्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विमा भरपाईची प्रतीक्षा आता संपण्याची चिन्हे दिसत असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 


Protected Content

Play sound