जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले असले तरी, सध्याच्या आर्थिक परिस्थितीत ते एकाच वेळी पूर्ण करणे शक्य नाही. यासाठी थोडा अवधी लागेल, कारण सरकारसमोर पाच वर्षांचा कालावधी आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख करताना आठवले यांनी कोल्हापूरमधील निवडणुकीपूर्वी झालेल्या सभेचा संदर्भ दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या त्या सभेत या योजनेत पात्र महिलांना २१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती आणि त्यावेळी ते रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले. मात्र, सध्या तरी आर्थिक परिस्थितीमुळे लगेच २१०० रुपये देणे शक्य नसले तरी, भविष्यात निश्चितच यावर सकारात्मक विचार केला जाईल. आता मिळत असलेले १५०० रुपये हे पहिले मोठे पाऊल असून, आगामी काळात वाढ करून २१०० रुपये देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलताना आठवले म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि टप्प्याटप्प्याने नक्कीच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार दिलेले आश्वासन पाळण्याची भूमिका ठेवते, असेही ते म्हणाले. या प्रतिक्रियेतून रामदास आठवले यांनी एका बाजूला सरकारची आर्थिक बाजू आणि दुसरीकडे निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन याची जाणीव करून दिली. ‘लाडकी बहीण’ योजनेत वाढीव रक्कम देण्याची आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सरकारची सकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र हे दोन्ही निर्णय टप्प्याटप्प्याने होतील, हे त्यांनी स्पष्ट केले.