Home धर्म-समाज  आदिवासी दिनानिमित्त यावलमध्ये ९ रोजी शासकीय कार्यक्रम, नागपूरहून होणार थेट प्रक्षेपण

 आदिवासी दिनानिमित्त यावलमध्ये ९ रोजी शासकीय कार्यक्रम, नागपूरहून होणार थेट प्रक्षेपण


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट २०२५ रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्यातर्फे भव्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक योगदानाला मान्यता देण्यासाठी साजरा होणाऱ्या या दिवसासाठी संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. यावर्षीचा कार्यक्रम यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात, चोपडा रोडवर सकाळी १०:०० ते दुपारी २:०० या वेळेत पार पडणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०:०० वाजता प्रकल्प कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाने होणार असून, यानंतर सामाजिक संस्थांकडून भव्य मिरवणूक आणि जीवन्त तसेच चित्ररूप देखावे सादर केले जाणार आहेत. या उपक्रमामध्ये आदिवासी संस्कृतीचे वैभव, परंपरा आणि संघर्षाचे दर्शन घडविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, आदिवासी समाजातील महिला सक्षमीकरणासाठी ‘विरांगणा राणी दुर्गावती महिला सबलीकरण व सक्षमीकरण मेळाव्याचे’ आयोजनही या दिवशी करण्यात आले आहे.

सोळाव्या शतकातील गोंडवाना साम्राज्याची पराक्रमी राणी दुर्गावती यांचा शौर्यपूर्ण इतिहास या दिवशी केंद्रस्थानी असणार आहे. तलवारबाजी, घोडेस्वारी, नेमबाजी यासारख्या शस्त्रकलेत निपुण असलेल्या राणी दुर्गावती यांनी मुघलांच्या आक्रमणाविरोधात शौर्याने लढा दिला. मृत्यू पत्करण्यापेक्षा आत्मबलिदान स्वीकारणाऱ्या या वीरांगनेच्या स्मृतीप्रित्यर्थ नागपूर येथे कविवर्य सुरेश भट सभागृहात दुपारी १२:३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. याचा थेट प्रक्षेपण यावल येथील कार्यक्रमात दाखवण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी, आदिवासी सेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच पंचक्रोशीतील आदिवासी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी जिल्ह्यातील आदिवासी महिला आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमात उपस्थित राहून आदिवासी समाजाच्या सन्मानासाठी होणाऱ्या या भव्य आयोजनाचा लाभ घ्यावा.


Protected Content

Play sound