शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. सदानंद भिसे यांची नियुक्ती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्याऐवजी आता महाराष्ट्र शासनाने परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. सदानंद भिसे यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचा आदेश गुरुवार दि. २० जून रोजी काढला आहे.

डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बदली झाल्यानंतर अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कान नाक व घसाशास्त्र विभागातील प्रा. डॉ. गिरीश ठाकूर यांच्याकडे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने दि. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अधिष्ठातापदाची सूत्रे हाती दिली होती. त्यानंतर दीड वर्ष डॉ. गिरीश ठाकूर यांनी अधिष्ठातापदाचा कार्यभार सांभाळला. जळगाव येथील महाविद्यालय व रुग्णालयाची स्थिती बदलवून त्यांनी रुग्णसेवेसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. हे निर्णय घेत असताना त्यांनी डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचाऱ्यांनादेखील मनोबल देण्याचा प्रयत्न केला. त्या काळात चिंचोली येथील प्रस्तावित बांधकामाचे काम देखील ५०% च्यावर पूर्ण झाले आहे.

आता महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून महाराष्ट्रातील काही अधिष्ठातांच्या बदल्यांचे आदेश गुरुवार दि. २० रोजी निघाले. त्यामध्ये डॉ. गिरीश ठाकूर यांना अलिबाग येथील मूळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याबाबत आदेश देण्यात आले आहे. तर जळगाव येथील अधिष्ठातापदी परभणी येथील शासकीय वैद्यकीय विभागाचे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. सदानंद भिसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपसचिव शंकर जाधव यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहे. त्याचबरोबर पुणे येथील बीजे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यांच्या जागी आता मुंबई येथील ग्रँड वैद्यकीय महाविद्यालयाचे अस्थीव्यंगोपचार शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. त्यांचाही आदेश गुरुवारी निघाला आहे.

Protected Content