उपेक्षित कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील : पालकमंत्री ना. गिरीष महाजन

eb314ae2 0089 4e7f 8df3 d725da8a1805

 

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या कित्येक वर्षांपासून उपेक्षित असलेला बांधकाम क्षेत्रातील कामगार दुर्लक्षितच होता. केंद्र व राज्य शासनाने या कामगारांच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात लाभाच्या योजना राबविल्याने आज खऱ्या अर्थाने गाव, तांड्यावरील कामगारांचे जीवनमान उंचावण्यास शासन मदत करीत असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांनी केले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांसाठी 29 कल्याणकारी योजनांचा लाभ वाटपाचा सोहळा पालकमंत्री ना. महाजन यांच्या हस्ते जामनेर, जि. जळगाव येथील स्व. इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जळगाव जिल्हा परिषदेच्य अध्यक्षा उज्वलाताई पाटील, पंचायत समितीच्या सभापती नीता पाटील, कामगार आयुक्त जि.जे. दाभाडे, चंद्रकांत बाविस्कर, गटविकास अधिकारी अजय जोशी, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे आदि उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ना. महाजन पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरगरिबांच्या व कष्टकरी जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहेत. या योजनांचा लाभ प्रत्येक कामगारास मिळण्यासाठी त्यांची नोंदणी होणे आवश्यक आहे. याकरीता इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने अशा कामगारांची नोंद होण्यासाठी पुढाकार घ्यावा. शासनाच्या योजनांचा लाभ सर्व नोंदीत झालेल्या बांधकाम कामगारांना मिळाला पाहिजे. याकरीता एकही कामगार नोंदणी वाचून राहणार नाही याची मंडळाने दक्षता घेण्याचे आवाहनही ना. महाजन यांनी केले.

कामगार कल्याण मंडळाचे सचिव श्रीरंगम निवास यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, राज्यात आतापर्यंत 18 लाख 75 हजार कामगारांची नोंदणी मंडळाकडे झाली आहे. 5 लाख 98 हजार कामगारांना लाभाच्या किटचे वाटप करण्यात आले. मंडळामार्फत कामगारांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. शासनाच्या वतीने राज्यात पुणे, मुंबई, नागपूर व ठाणे या चार जिल्ह्यात कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस पालकमंत्री ना. महाजन यांच्या हस्ते मीना कुमावत, संगीता पाटोळे, अलका महाजन, भगवान मिस्त्री, संजय मिस्त्री, रमेश महाजन, रामदास पाटील, राजू लोहार, अशोक पाटील आदींना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश व लाभाच्या किटचे वाटप करण्यात आले. जामनेर तालुक्यात 1750 कामगारांची नोंदणी करण्यात आली. आज 1500 कामगारांना लाभांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली.

कार्यक्रमास आतिष झाल्टे, महेंद्र बाविस्कर, श्रीराम महाजन, अशोक पालवे, जीतू पाटील, पितांबर भावसार यांचेसह नासिक व जळगाव येथील कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कामगार व त्यांचे कुटूंबिय, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content