मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राज्यात तापलेलं वातावरण पाहता, सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं असून, घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. मराठा समाजाच्या वाढत्या आक्रमकतेमुळे सरकारवर दबाव वाढला असून, याच पार्श्वभूमीवर आज एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची तातडीची बैठक आज होणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलनाची दिशा निश्चित केली आहे. मागील काही महिन्यांपासून सातत्याने आंदोलने आणि उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाज आपली मागणी सरकारपुढे मांडत आहे. आज आझाद मैदानावर भगव्या झेंड्यांनी भरलेलं दृश्य पाहायला मिळत असून, “आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही” ही भूमिका स्पष्टपणे मांडण्यात आली आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं, ही या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे.

सरकारने या आंदोलनाची गंभीर दखल घेतली असून, मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ‘रॉयल स्टोन’ बंगल्यावर आज तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी दादा भुसे, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन यांच्यासह उपसमितीतील इतर सदस्य दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी देखील विखे पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. बैठकीत आंदोलनाची पार्श्वभूमी, समाजाच्या मागण्या आणि त्यावर संभाव्य तोडगा यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
बैठकीनंतर उपसमितीचे सदस्य आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की, केवळ चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा चालणार नाही. ठोस निर्णय आणि कृती पाहिजे. यामुळे आजची बैठक निर्णयप्रक्रियेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, आमदार सुरेश धस आणि आमदार प्रकाश सोळंके देखील विखे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी रॉयल स्टोन बंगल्यावर पोहोचले आहेत. हे दोघेही मराठा समाजातील जनतेशी थेट संवाद साधणारे नेते असून, यांचं उपस्थित राहणं या बैठकीला आणखी महत्त्व प्राप्त करून देत आहे.
आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून, मुंबईतील आझाद मैदानावर मराठा बांधव मोठ्या संख्येने जमले आहेत. हायकोर्टाने सुरुवातीला आंदोलनाला परवानगी नाकारली होती, मात्र अटींनुसार एक दिवसाची परवानगी मिळाल्यानंतर आंदोलन सुरू झालं. काल आंदोलनाची मुदत वाढवण्यात आली असून, आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन अधिक आक्रमक पद्धतीने सुरू आहे.



