Home प्रशासन तहसील यावल येथे शासकीय भरड धान्य केंद्राचा शुभारंभ

यावल येथे शासकीय भरड धान्य केंद्राचा शुभारंभ


 यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांच्या हितासाठी यावल येथे शासकीय भरड धान्य केंद्राचा आज, दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी भव्य शुभारंभ करण्यात आला. यावल येथील सातोद मार्गावरील शासकीय गोदामात विविध मान्यवर, प्रशासकीय अधिकारी आणि शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला असून शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी काटा पूजन व धान्य पूजन करण्यात आले. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सूचनेनुसार प्रथम धान्य विक्रीचा मान दहीगाव येथील शेतकरी भास्कर नागो फेगडे यांना देण्यात आला. यामुळे केंद्रावर धान्य विक्रीस सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

पहिल्यांदा शासकीय भरड धान्य केंद्रावर धान्य विक्री करणाऱ्या अन्नदाता शेतकरी भास्कर फेगडे यांचा शासनाच्या वतीने यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शासन थेट शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीने धान्य खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार असून बाजारातील दलालांवर अवलंबित्व कमी होणार आहे.

यानंतर हे भरड धान्य केंद्र कोरपावली विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकृतपणे सुरू करण्यात आले. केंद्र शासनाच्या या उपक्रमाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून परिसरातील अनेक शेतकरी धान्य विक्रीसाठी दाखल होत असल्याचे चित्र आहे.

या कार्यक्रमास यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, पुरवठा अधिकारी अभिमन्यू चऱ्हाटे, गोदाम अधीक्षक वाय. डी. पाटील, सुकलाल कोळी, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जेनसिंग राजपूत, माजी सभापती कृषिभूषण नारायण चौधरी, बाजार समिती संचालक हर्षल पाटील, सागर महाजन, शेतकी संघ संचालक तेजस पाटील, कोरपावली सोसायटीचे सचिव मुकुंदा तायडे यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी कोरपावली विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन तसेच यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राकेश फेगडे यांनी केंद्र शासनाच्या भरड धान्य खरेदी योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत उपस्थित शेतकऱ्यांचे स्वागत व आभार मानले. शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात स्थैर्य येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound