जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ या नऊ प्रमुख संघटनांच्या संयुक्त समितीने मंगळवारी, २७ जानेवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या अनुषंगाने जळगावातील बँक कर्मचाऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर निदर्शने मांडून आपल्या प्रलंबित मागण्या पुर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी विविध घोषणाही देण्यात आले.

विशेष म्हणजे, शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांनंतर, सोमवारी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुट्टी होती. त्यानंतर आज २७ जानेवारीला पुकारलेल्या संपामुळे बँका सलग चौथ्या दिवशी बंद राहणार आहेत. २२ जानेवारीनंतर बँकांचे व्यवहार थेट २८ जानेवारीलाच सुरळीत होतील. यामुळे चेक क्लिअरन्स, रोख रक्कम काढणे आणि इतर महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी जनतेची मोठी गैरसोय झाली आहे.

बँक कर्मचारी प्रामुख्याने ‘आठवड्यातून पाच दिवस काम’ या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. मार्च २०२४ मध्ये ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ (IBA) सोबत झालेल्या करारात सर्व शनिवार सुट्टी देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र, अनेक महिने उलटूनही या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्याने संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे. सध्या बँकांना केवळ दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते, तर उर्वरित आठवड्यात सहा दिवस काम करावे लागते.
या संपात स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया यांसारख्या मोठ्या सरकारी बँकांसह खासगी बँकांचे कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपाच्या या कालावधीत केवळ ऑनलाइन बँकिंग आणि एटीएम सेवा सुरू होते.



