Home Cities जळगाव वडिलांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त गोसावी दाम्पत्याचा अनोखा उपक्रम

वडिलांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त गोसावी दाम्पत्याचा अनोखा उपक्रम


जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वडिलांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त रूढी-परंपरा बाजूला ठेवून समाजहितासाठी कार्य करण्याचा प्रेरणादायी संदेश देत मुक्ता व मुकुंद गोसावी या दाम्पत्याने स्वयंस्फूर्त रक्तदानासह आरोग्य शिबिर, वृक्षरोपण, अन्नदान, सत्संग आणि विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करून नवा आदर्श घालून दिला. मुक्ती फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

दिव्यांग असूनही विक्रमी रक्तदाता म्हणून ओळख असलेले मुकुंद गोसावी यांनी आपल्या वडिलांचे कै. देवपुरी रामपुरी (डी.आर. नाना) गोसावी यांच्या डिसेंबर 2024 मधील निधनानंतर परंपरेत बदल घडवत तेराव्या दिवसापासून वृक्षारोपण, रक्तदान, सत्संग तसेच अवयवदान-देहदान, मतदान जनजागृती अशी सामाजिक कार्यश्रृंखला सुरू ठेवली होती. तेराव्या दिवशी पारंपरिक ‘दुखवटा’ न करता वृक्षलागवड व रक्तदानाचे आवाहन करण्यात आले होते. नातेवाईक आणि परिचितांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान तसेच वृक्षारोपण केले होते. या उपक्रमांचे सर्वदूर कौतुक झाले.

“समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो” या भावनेतून, तसेच संघ शताब्दी वर्ष व ‘वंदे मातरम्’ गीताच्या 150 वर्षपूर्तीनिमित्त 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत श्रीराम नगर (दादावाडी परिसर) येथे विश्वशांती प्रार्थना, वृक्षवाटप, वृक्षारोपण, अवयवदान-देहदान जागृती, मतदान जनजागृती तसेच भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तपुरवठ्यात निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर विशेष रक्तदान शिबिरही संपन्न झाले. या शिबिराचे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सिव्हिल हॉस्पिटलच्या सहकार्याने करण्यात आले.

या अनोख्या आणि प्रेरणादायी उपक्रमात मुक्ता व मुकुंद गोसावी यांनी स्वयंस्फूर्त रक्तदान केले. एकूण 41 जणांनी रक्तदान करून समाजसेवेला हातभार लावला. आर मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमकडून हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह व सर्वसाधारण तपासणींसाठी आयोजित आरोग्य शिबिराचा 269 नागरिकांनी लाभ घेतला. तसेच पिंप्राळा स्मशानभूमी परिसरात 11 बेलवृक्षांची लागवड करण्यात आली तर 21 निम्बवृक्षांचे वाटप नागरिकांना करण्यात आले.

जळगाव, धुळे, संभाजीनगर, अहिल्यनगर, नाशिक, बुलढाणा आदी जिल्ह्यांतील दशनाम गोसावी समाजबांधवांसह श्रीराम नगर परिसरातील नागरिक उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. शि.रा. गोसावी, सौ. विजया गोसावी, कैलासपूरी गोसावी, अनिलकुमार गोसावी, सौ. संध्या गोसावी, किशोरपूरी गोसावी, शाम गोसावी, अक्षय गोसावी, भाग्यश्री गोसावी, अर्चना रवींद्र गिरी, योगेश गोसावी, किरण गोसावी, आशीष गोसावी, सागर गोसावी, डॉ. अजय देशमुख, गोपाल वालेचा, स्वप्निल पालवे, गोपाल चौधरी, सतीश महाजन, हर्षद भारती, परिमल गिरी, अनिल गिरी यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound