मुंबई, वृत्तसंस्था | गोपीचंद पडळकर हे ढाण्या वाघ आहेत, त्यांनी बारामतीतून लढावे असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. गोपीचंद पडळकर हे वंचित आघाडीमध्ये गेले होते, मात्र आज त्यांनी पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी येथील गरवारे क्लबमध्ये आज (दि.३०) मुख्यमंत्र्यांनी एक भाषण केले. या भाषणात त्यांनी हे वक्तव्य केले. याबाबत आपण पक्षश्रेष्ठींशी चर्चा करु आणि योग्य तो निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पडळकर आणि अजित पवारांमध्ये बारामतीत लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे गोपीचंद पडळकर यांची बारामतीमधली उमेदवारी निश्चित मानली जाते आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांनाही विचारले की, पडळकर यांना बारामतीतून निवडणूक लढवावी का? असे विचारताच सगळ्या कार्यकर्त्यांनी हो असे म्हटले. त्यामुळे आता पडळकर विरुद्ध अजित पवार असा सामना बारामतीत बघायला मिळण्याची शक्यता आहे. पडळकर बारामतीमधून लढणार हे निश्चित झाले आहे, त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडली. दरम्यान त्याच पत्रकार परिषदेनंतर जेव्हा ते माध्यमांशी बोलले तेव्हा शरद पवार देतील ती जबाबदारी घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले होते. बारामतीतून लढ असे शरद पवार यांनी आपल्याला सांगितल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर अजित पवार लढणार हे निश्चित मानले जात आहे. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गोपीचंद पडळकर यांनी बारामतीतून लढावे असे वक्तव्य केले. त्यामुळे अजित पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली तर ही लढत निश्चितच रंगतदार होईल यात शंका नाही.