अमळनेर ईश्वर महाजन । आई-बाबांना घराबाहेर काढण्याच्या तयारीत असलेल्या मुलगा व सुनेला तहसीलदार ज्योती देवरे यांनी नोटीस बजावताच हा गृहकलह तात्काळ मिटला. रात्रीच हा कलह मिटवणार्या तहसीलदार देवरे यांचे कौतुक होत आहे.
सरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांवर नेहमी चुकारपणाचा आरोप करण्यात येतो. अगदी कार्यालयीन वेळेतसुध्दा काम होत नसल्याची नेहमीच ओरड करण्यात येते. या पार्श्वभूमिवर, कुणी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर रात्री उशीरा कर्तव्य बजावेल यावर आपला विश्वास बसणार नाही. मात्र अमळनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ही बाब प्रत्यक्ष करून दाखवली आहे.
अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथिल सुरेश बुधा बडगुजर व चंद्रकला या वृद्ध दाम्पत्याना त्यांचा मुलगा प्रताप बडगुजर याने घराबाहेर काढून शेतीचा ताबाही घेतला होता. मागील काळात याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे दाद मागितली होती. उपविभागीय अधिकार्यांनी वृद्ध दाम्पत्याला त्यांच्या घराचा ताबा द्यावा शेतीचे उत्पन्न घेऊ द्यावे आणि दर महिन्याला एक हजार रुपये मुलाने आई वडिलांना द्यावेत असे आदेश दिले होते. मात्र दोन वर्षांपासून आदेशाची अमलबाजवणी झाली नव्हती. दरम्यान, ३ एप्रिल रोजी पुन्हा मुलगा आणि सुनेने आई वडिलांना बाहेर काढल्याने त्यांनी तात्काळ तहसील कार्यालय गाठले.
वयोवृध्द सुरेश बडगुजर यांना लखवा झाल्याने त्यांना धड उभे राहता येत नव्हते. त्यांची समस्या ऐकून व परिस्थिती पाहून तहसीलदारांनी ताबडतोब मंडलाधिकारी भानुदास शिंदे, लिपिक संदीप पाटील व वृद्ध दाम्पत्याला घेऊन कळमसरे गाठले. तेथील तलाठी एस.बी.बोरसे, पोलीस पाटील बापू निकम, सरपंच कल्पना पवार यांच्या समक्ष प्रताप व त्याच्या पत्नीला विनंती करून सासू सासर्यांना घरात घेण्याची विनंती केली. मात्र त्यांनी नकार देताच घराचा ताबा घेण्याची नोटीस दाराला चिकटवली. आणि पुन्हा समन्वय घडवण्याचा प्रयत्न केला अखेर तहसीलदारांनी कायद्यावर बोट ठेवताच प्रताप व त्याच्या पत्नीने वृद्ध दाम्पत्याचा पाया पडून सन्मानाने घरात घेतले. आयुष्यभर रक्ताचे पाणी करून वाढवलेल्या मुलांना आई-वडिलांविषयी काहीच वाटत नाही, हे पाहून, ऐकून तहसिलदारांचे मन सुन्न झाले. मात्र त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून एक कुटुंबातील कलह मिटवला.
तहसीलदारांनी रात्रीच दखल घेऊन साडे नऊ वाजता कौटुंबिक समस्या सोडविल्याबद्दल गावकर्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, या शेतकरी कुटुंबातील मुलगीचा शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय तहसिलदार यांनी घेतला आहे. त्यांचे कळमसरे गावकर्यांनी सर्वत्र अभिनंदन केले.