मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देण्याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याने उद्या शहरातील नियोजीत अतिक्रमण हटाव मोहिम तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली आहे.
मुक्ताईनगर शहरातील प्रमुख भाग असलेल्या प्रवर्तन चौकासह अन्य ठिकाणचे अतिक्रमण हे १० ऑगस्ट रोजी काढण्यात येणार असल्याचे आधी निश्चीत करण्यात आले होते. या संदर्भात सर्व अतिक्रमणधारकांना अलीकडेच म्हणजे ५ ऑगस्ट रोजी अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. यामुळे १० रोजी अतिक्रमण निघणार असल्याचे निश्चीत मानले जात होते.
दरम्यान, उद्या अतिक्रमण निघणार की नाही ? याबाबत मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण पसरले असून कुणाला काहीही कळेनासे झाले आहे. या अनुषंगाने लाईव्ह ट्रेंडस न्यूजने प्रभारी मुख्याधिकारी श्री. तायडे यांच्याकडे विचारणा केली. यावर ते म्हणाले की, आमदार चंद्रकांत पाटील यांनी अतिक्रमणधारकांना आधी पर्यायी जागेची व्यवस्था केल्यानंतरच अतिक्रमण काढण्यात यावेत असे सुचविले आहे. या संदर्भात शहरातील मटन मार्केटसह अन्य ठिकाणी पर्यायी जागांचा शोध सुरू आहे. ही तजवीज झाल्यानंतरच शहरातील अतिक्रमणे काढण्यात येणार असून उद्याची अर्थात १० ऑगस्टची मोहिम तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती देखील श्री. तायडे यांनी दिली आहे. यामुळे शहरातील अतिक्रमणधारकांना तूर्तास दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.