मुंबई वृत्तसंस्था । देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ अर्थात ‘एलआयसी’ने आपल्या ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. एलआयसीने दोन वर्षांपासून पॉलिसी बंद असणाऱ्या ग्राहकांना ती पुन्हा चालू करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. तसेच ज्या ग्राहकांच्या पॉलिसीचे नूतनीकरण रखडले आहे त्यांना ती पुन्हा चालू करता येणार आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळाने दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीत हप्ता न भरलेल्या विमाधारकांना विमा योजनेचे (पॉलिसी) पुनरुज्जीवन करण्याची अनुमती दिली आहे. यामुळे महामंडळाने विकलेल्या एकूण योजनेचा विमा हप्ता भरणे सुरू असलेल्या योजनेच्या गुणोत्तरात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीत हप्ता थकल्यास योजनेचे नूतनीकरण शक्य नव्हते. सुधारित आदेशामुळे आता दोन वर्षांहून अधिक काळासाठी हप्ता थकूनही योजनेचे नूतनीकरण शक्य होणार आहे, असे महामंडळाच्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीच्या नियमांनुसार कुणीही पॉलिसीधारक सलग दोन वर्षे प्रीमियम भरत नसेल तर, त्याची पॉलिसी बंद करण्यात येते. एकदा बंद झालेल्या पॉलिसीचे नूतनीकरण करण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता.
महामंडळाने विमा नियामक मंडळाकडे केलेल्या विनंतीला अनुसरून १ जानेवारी २०१४ नंतर विकलेल्या कंपनीचा विमा हप्ता थकीत झाल्यामुळे निलंबित केलेल्या युनिट लिंक्ड योजना ३ वर्षांच्या आत आणि हप्ता थकीत झाल्यामुळे निलंबित केलेल्या नॉन-लिंक्ड योजना ५ वर्षांच्या आत पुनर्जीवित करणे शक्य होणार आहे. १ जानेवारी २०१४ नंतर महामंडळाने विकलेल्या आणि दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी हप्ता थकल्यामुळे निलंबित अवस्थेत गेलेल्या योजनांचे आता पुनरुज्जीवन शक्य झाले आहे.