चाळीसगांव (प्रतिनिधी) गांधी रिसर्च फाऊन्डेशन, जळगांव व नानासाहेब य.ना. चव्हाण महाविद्यालय चाळीसगांवतर्फे नुकत्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी म. गांधींच्या पुस्तकांवर आधारीत ‘गांधी विचार परीक्षा’ घेण्यात आली होती.
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “विधायक कार्यक्रम”, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “पंचायत राज” तर तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ”हिंद स्वराज” या गांधीजींनी लिहिलेल्या पुस्तकांवर आधारीत ७० गुणांची बहुपर्यायी प्रश्न असलेली लेखी परिक्षा घेण्यात आली होती. सदर परिक्षेला महाविद्यालयातील एकुण ८२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी महाविद्यालयातील तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थीनी कु. सारिका राजेंद्र शितोळे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक पटकावले तर तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी चि. निर्मल चंद्रकांत ब्रम्हेचा याने द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन रजत पदक पटकावले. महाविद्यालयाने गांधी विचार परिक्षेत सुवर्ण पदक सलग दुस-यांदा पटकावले आहे.
गेल्या वर्षी महाविद्यालयाचा विद्यार्थी चि. आदर्श दत्तात्रय मिसाळ या विद्यार्थ्याने सुवर्ण पदकावर आपले नांव कोरले होते.
रा. स. शि. प्र. मं. लि. चाळीसगांवचे अध्यक्ष डॉ. एम. बी. पाटील, सचिव अरूण निकम, उपाध्यक्ष संजय देशमुख, दु. चिटणीस संजय रतन पाटील व सर्व संचालक मंडळ, महाविद्यालय विकास समिती सदस्य, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक बंधु-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा.के.पी. रामेश्वरकर (स्पर्धा समन्वयक), प्रा.एच.आर. निकम, प्रा.डॉ.जी.डी. देशमुख, प्रा.सी.डी. ठोंबरे, प्रा.डॉ.ए.एल. सुर्यवंशी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले.