बुलढाणा येथे महावितरण आणि औद्योगिक ग्राहक यांची सु-संवाद बैठक

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | औद्योगिक ग्राहकांना सुरळीत आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरण बांधील आहे. त्यामुळे औद्योगिक ग्राहकांना नविन वीज जोडणी देण्यासोबत, त्यांच्या वीजबिल,तसेच वीज पुरवठ्याशी संबंधित तक्रारी असल्यास त्या तत्परतेने सोडविण्यात याव्यात असे निर्देश अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी जिल्ह्यातील महावितरणच्या विभागप्रमुखांना दिले.

वीज ही विकासाची जननी आहे.त्यामुळे स्थानिक औद्योगिक ग्राहकांच्या वीज सेवेविषयी असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांना सुरळीत वीज सेवा देण्यासाठी नागपूर प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी दर तीन महिन्यांनी औद्योगिक ग्राहकांसोबत बैठक घेण्याचे निर्देश दिले आहे.त्यानुसार मुख्य अभियंता सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्या पुढाकाराने महावितरण आणि जिल्ह्यातील उद्योजक यांच्यात विद्युत भवन येथे सु-संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

महावितरणच्या एकुण महसुलात औद्योगिक ग्राहकांचा वाटा मोठा आहे.शिवाय कमी उत्पन्न गटातील तसेच कृषी ग्राहकाच्या अनुदानाचा भार औद्योगिक ग्राहक उचलत असल्याने औद्योगिक ग्राहक हा महावितरणसाठी अत्यंत महत्वाचा आहे. औद्योगित ग्राहकांना तत्काळ वीज जोडणी मिळावी,तसेच वीज पुरवठ्याशी,वीज बिलासी संबंधित त्यांच्या समस्यांचे निराकरणही तत्काळ व्हावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक ग्राहकांसाठी ‘स्वागत सेल’ ची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे औद्योगिक ग्राहकांनी खास त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या या एक खिडकी कक्षाचा लाभ घ्यावा असे आवाहनही अधीक्षक अभियंता यांनी यावेळी केले.

खामगाव उद्योजक संघटनेचे अध्यक्ष टावरी यांनी सहाय्यक अभियंता एमआयडीसी खामगाव भुसारी यांच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी उपस्थित सर्व औद्योगिक ग्राहकांना प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजना,योजनेचे फायदे,योजनेत असलेले अनुदान याची सविस्तर माहिती देत योजनेसी संबंधित माहिती वितरीत करण्यात आली.

Protected Content