जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गीताई नगर येथे राहणाऱ्या सोने कारागिराचे बंद घर फोडून सुमारे १५ लाख ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. या संदर्भात सायंकाळी ७ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मालचंद गौरीशंकर सोनी रा. गीताई नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबीय सहवास्तव्याला आहेत. दरम्यान १८ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराबाहेरील सेफ्टी डोअरचा तसेच घराच्या आतील लाकडी दरवाज्याचे कडी कोयंडा कापून आत प्रवेश करत घरातून सोने-चांदीचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण १५ लाख ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली. या संदर्भात मालचंद सोनी यांचे पुतणे नरेंद्र सोनी यांनी शनिपेठ पोलिसात याबाबत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले हे करीत आहे.




